मूळ पत्रिका’ शब्दाला फाटा देत संदीप व ऐश्वर्या यांचा शुभविवाह संपन्न

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी
लग्न पत्रिकेवर सचित्र सामाजिक संदेश छापून जपले सामाजिक भान
अमळनेर : तालुक्यातील शिवक्षेत्र खवशी येथील मूळ रहिवासी अमळनेर स्थित ज्येष्ठ पत्रकार संजय सूर्यवंशी यांचा लहान मुलगा संदीप याचा शुभविवाह आडगाव ता. पारोळा येथील मूळ रहिवासी धुळे स्थित श्री अविनाश मुरलीधर मोरे यांची कन्या ऐश्वर्या हिच्याशी नुकताच शनिवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ रोजी धुळे येथील रिद्धी सिद्धी ब्के बॅन्क्वेट हॉल येथे संपन्न झाला. यावेळी विविध स्तरातील मान्यवर उपस्थित होते. विशेष म्हणजे सूर्यवंशी परिवाराने व्हाट्सअप द्वारे लग्नपत्रिका पाठवून सर्वांना आमंत्रित केले. तसेच ‘मूळ पत्रिका’ शब्दाला फाटा देत लग्न पत्रिकेवर सचित्र सामाजिक संदेश छापून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
लग्न म्हटले म्हणजे नातेवाईकांनाच नव्हे तर ओळख असलेल्या कुटुंबांत लग्नपत्रिका पोहोचवणे, लग्नपत्रिकेवर ‘मूळ पत्रिका’ लिहिणे, ज्यांना मूळ लावले त्यांना भाडे देणे ही प्रथा रुढ झाली आहे. ‘मूळ पत्रिका’ लिहिले नसेल तर त्या घरातील महिला लग्नास नकार देतात. वास्तविक सर्व लग्नपत्रिकेत सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहावे अशी विनंती केलेली असते तरीही सुज्ञ कुटुंब ते मान्य करीत नाहीत ही शोकांतिका आहे. अशा अनावश्यक प्रथांना कोणीही विरोध करत नाही यावर शिवक्षेत्र खवशी ता. अमळनेर येथील रहिवासी संजय यमुना उत्तम सूर्यवंशी यांनी पत्रिकेवरच ‘मूळ पत्रिका’ का नसावी ? या संदर्भात मत व्यक्त करताना ‘कुटुंबातील सर्वांसाठी आमंत्रण’ हा शब्द सर्वांचा सन्मान व आदर राखणारा वाटतो. आम्हास सर्व सारखे असल्याने कोणालाही ‘मूळपत्रिका’ शब्द लिहून पत्रिका दिलेली नाही.’ असा लेखी मजकूर लग्नपत्रिकेवरच छापला आहे. याशिवाय नातेवाईकांसह सर्वांना सोशल मीडियाद्वारे लग्नपत्रिकांचे वाटप करुन नवा पायंडा घातला आहे. यापूर्वी संजय सूर्यवंशी यांनी सन २०१८ मध्ये आपल्या मुलीच्या विवाह प्रसंगी तर सन २०२२ मध्ये मोठ्या मुलाचे विवाह प्रसंगी ‘कुटुंबातील सर्वांसाठी आमंत्रण’ असे शिर्षक देऊन लग्नपत्रिका देणे पसंत केले होते. तोच प्रयोग पुन्हा लहान मुलाच्या विवाह प्रसंगी केला आहे. अनेक जणांनी याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
याशिवाय लग्नपत्रिकेत अधिक नावे न छापता …सचित्र सामाजिक संदेश छापले आहेत. या सामाजिक संदेशात पर्यावरण वाचवा, पाणी वाचवा, शिक्षण, रक्तदान, लेक वाचवा – लेक शिकवा, प्लास्टिक वापर बंदी, निरोगी जीवनाचा मंत्र, जंक फूडचा सुळसुळाट, निरोगी भारत, वीज वाचवा, बचत गट अशा गोष्टींचा प्रसार करण्यासाठी लग्नपत्रिकेत सचित्र सामाजिक संदेश छापले आहेत. या आगळ्यावेगळ्या प्रयोगातून संजय सूर्यवंशी यांनी जनतेला एकप्रकारे बदल घडवून आणण्यासाठी आवाहन केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!