धनदाई महाविद्यालयात सामाजिक न्याय दिन साजरा*
अमळनेर Express news
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर: “सामाजिक न्याय, साहित्य, कला, क्रीडा, शिक्षण, कृषी चित्रपटसृष्टी व जनकल्याणकारी कायदे आदी सर्व महत्वपूर्ण क्षेत्रात आपल्या दूरदृष्टीने व योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीने राजसत्ता ही लोकसत्तेसाठी कशी राबवावी याचे आदर्श उदाहरण म्हणजे राजर्षी शाहू महाराज आहेत” असे प्रतिपादन डॉ. लिलाधर पाटील यांनी केले. येथील धनदाई कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या यशवंत सभागृहात राजर्षी शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून धनदाईमाता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी. डी. पाटील हे तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले रयतेच्या राज्याचे स्वप्न आणि राष्ट्रपिता महात्मा फुले यांनी सांगितलेले तत्त्वज्ञान या आधारे सर्वसामान्य शोषित वंचित घटकांपर्यंत सामाजिक न्याय पोहोचवून आदर्श राज्याचे निर्माण आधुनिक महाराष्ट्रात शाहू महाराजांनी केले असल्याचे डॉ पाटील यांनी विविध उदाहरणांद्वारे स्पष्ट केले. प्रमुख अतिथी डी. डी. पाटील यांनी फुले शाहू आंबेडकरांमुळे महाराष्ट्राची वाटचाल पुरोगामी विचारांच्या दिशेने झाल्याचे सांगून शाहू महाराजांच्या जीवनातील विविध आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकरावेत असे आवाहन केले.
आपल्या अध्यक्षीय मनोगत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांनी राजर्षी शाहू महाराजांचे संपूर्ण जीवन जनकल्याणासाठी समर्पित असून राज्यघटनेत असलेल्या सामाजिक न्याय तत्त्वाचे ते आद्य समर्थक व खऱ्या अर्थाने रयतेचे राजे असल्याचे सांगितले. याप्रसंगी डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. राहुल इंगळे, डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. भगवान भालेराव,डॉ. शैलेश पाटील, कैलास अहिरे एस बी गिरासे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा मीनाक्षी इंगोले यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. रमेश पावरा यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. प्रवीण पवार, डॉ. महादेव तोंडे, राजेंद्र पाटील, दगडू पाटील, किशोर पाटील आदींनी विशेष प्रयत्न केले.


