श्री मंगळ जन्मोत्सव अभूतपूर्व सोहळ्यास २९ पासून सुरुवात तीन दिवस भरगच्च धार्मिक कार्यक्रम : मंगळवारी जन्मोत्सवाचा २७ वर्षांनी योग

0

अमळनेर Express news

अमळनेर प्रतिनिधी

अमळनेर : श्री मंगळग्रहाच्या प्रभावाच्या वर्षात मंगळवारी मंगळ जन्मोत्सव येणे हा मंगल महायोग दर २७ वर्षांनी येतो. हा मंगल महायोग यावर्षी २ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ जन्मोत्सव भव्य-दिव्य स्वरुपात साजरा करण्याचे सुनिश्चित केले आहे. त्यानिमित्ताने येथील श्री मंगळ ग्रह मंदिरात २९ ऑगस्ट, ३१ ऑगस्ट आणि २ सप्टेंबर रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या सोहळ्यात देशभरातील कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची उपस्थिती लाभणार आहे.
शुक्रवार, दि. २९ ऑगस्ट रोजी सकाळ सत्रात श्री मंगळग्रह मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव असलेल्या त्रिशुलात्मक श्री कालभैरव व श्री भैरवी माता यांच्या मंदिराचे कलशारोहण फैजपूर येथील महामंडलेश्वर स्वामी श्री जनार्दनजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. तर दुपार सत्रात महाभोमयाग होणार आहे. यात नऊ मानकरी सपत्नीक असणार आहेत.
रविवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी सकाळ व दुपार सत्रात नवकुंडी महाविशेष शांतीयाग होणार आहे. यात दोन्ही सत्रात प्रत्येकी ३६ मानकरी सपत्नीक असणार आहेत.
तर मंगळवार. दि. २ सप्टेंबर राजी पहाटे ४ ते ७ वाजेदरम्यान परंपरेनुसार श्री मंगळ जन्मोत्सव होणार आहे. यात श्री मंगळ महाविशेष अभिषेक, श्री पंचामृत महाभिषेक, नूतन ध्वजारोहण, ५६ भोगार्पण, श्री मंगळ महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत. या सर्व धार्मिक विधी व कार्यक्रमांचे मानकरी म्हणून देशभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांना आंमत्रित करण्यात आले आहे.
या महासोहळ्यास संतश्री सद्गुरू सखाराम महाराज यांचे गादीपती संतश्री सद्गुरू प्रसाद महाराज यांचे आशीर्वाद लाभले आहे. तर युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे,जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांचे भक्कम सहकार्य व मार्गदर्शन लाभले आहे. या सोहळ्याचे निमंत्रक खासदार स्मिता वाघ आणि माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील हे असून या श्री महामंगल सुवर्णयोगाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक वाचक बातमी

error: Content is protected !!