शैक्षणिक विज्ञान अभ्यास दौऱ्या”तून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाधारित शिक्षण!
अमळनेर Express news
मारवड विकास मंचच्या माध्यमातून 21 शाळांमधील विद्यार्थ्यांना अनोखी भेट
अमळनेर : विद्यार्थ्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा तसेच भविष्यात युवा वैज्ञानिक घडावेत यासाठी येथील “मारवड परिसर विकास मंच” च्या माध्यमातून अमळनेर तालुक्यातील 20 व धरणगाव तालुक्यातील 1 अशा एकूण 21 शाळांमध्ये “डॉ. कलाम फिरती प्रयोगशाळा” हा उपक्रम गेल्या दोन वर्षांपासून सुरु आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे प्रत्यक्ष, प्रयोगाधारित ज्ञानाचे धडे मिळत आहे. त्यानंतर “मिल के चलो असोसिएशन” यांच्या सहकार्याने “डॉ. अब्दुल कलाम विज्ञान संशोधन परीक्षा” घेण्यात आली. या परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 21 शाळांमधील 57 विद्यार्थी व 25 शिक्षकांची “दोन दिवसीय शैक्षणिक विज्ञान अभ्यास दौरा नुकताच छत्रपती संभाजीनगर येथे काढण्यात आला.
आयकर आयुक्त संदिपकुमार साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आदिवासी विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त कपिल पवार यांच्या सहकार्याने हा अभ्यास दौरा काढण्यात आला. “मारवड परिसर विकास मंच” ने या संपूर्ण अभ्यास दौऱ्याची आर्थिक जबाबदारी स्वीकारली आहे. यात विद्यार्थ्यांनी वेरूळ येथील जागतिक वारसा स्थळ असलेल्या लेण्यांना भेट देऊन तेथील अद्भुत शिल्पकौशल्य, स्थापत्यकला व प्राचीन इतिहासाचा सखोल अभ्यास केला. संपूर्ण मोठया शिल्पात कोरलेल्या कैलास मंदिराची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली. त्यानंतर बेलराईज कंपनीला दिलेल्या भेटीतून आधुनिक उद्योगविश्व, उत्पादन प्रक्रिया व तंत्रज्ञानाची प्रत्यक्ष माहिती मिळाली. मराठवाड्याचा ताजमहाल म्हणून प्रसिद्ध असलेल्या बीबीका मकबारा चे रात्रीची रोषणाई पाहून सर्वच जन आश्चर्यचकित झाले. सिद्धार्थ गार्डनमधील निसर्गसौंदर्याने विद्यार्थ्यांना जैवविविधता व पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवता आले. मराठवाडा स्वातंत्र्य संग्रामाचा चित्ररूपी इतिहास विद्यार्थ्यांना अनुभवता आला. विद्यार्थ्यांनी देवगिरी (दौलताबाद) किल्ल्याला भेट देऊन त्याचा गौरवशाली इतिहास, संरक्षण व्यवस्था व ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली. त्यानंतर भद्रा मारोती चे विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. या शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली असून विज्ञान, इतिहास, उद्योग आणि पर्यावरण या विषयांबद्दलची जिज्ञासा अधिक दृढ झाली आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, आत्मविश्वास व व्यापक दृष्टीकोन विकसित होत असून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांना साकार करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मिळाले ‘अनोखे गिफ्ट’!
औरंगाबाद जिमखाना क्लब चे मालक महेंद्र सुराणा यांच्या कडुन विद्यार्थ्यांसहीत सर्व शिक्षकांना ‘स्कुल बँग्स’ भेट देण्यात आल्या. नम्रता कॅटर्स चे मालक पंकज मुगदिया यांनी उत्तम भोजन व नाश्त्याची व्यवस्था करून दिली. छत्रपती संभाजीनगर येथील “रिलायबल स्पर्धा परीक्षा केंद्र” चे प्रमुख धनंजय आकात यांच्या केंद्राला विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्यांनी दुपारच्या भोजनाची व्यवस्था करून दिली. देवेंद्र साळुंखे, महेश पाटील, अनिरुद्ध पाटील, डी.ए.धनगर, उमेश काटे, विनायक पाटील, अतुल सैंदाने, अनिता बोरसे, गोपाल हडपे यांनी दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे यशस्वी नियोजन केले. त्यांना संजय बागल, विजय मोरे, राकेश पवार, संतोष सुतार, सुरेश महाजन, पी.एच.पाटील, निलेश साळुंखे, राजेंद्र पाटील, निलेश जाधव, मनोहर पाटील, बाळासाहेब बोरसे, पंकज धनगर, मनिषा पवार, भारती बहिरम, मंगला चव्हाण, चेतन वैराळे, अशोक पाटील यांचे सहकार्य लाभले.
——

